पिंपरी : हेल्मेटसक्तीच्या घोषणेनंतर शहरात बहुतांश दुचाकीस्वारांनी घरात धूळ खात पडलेले हेल्मेट पुन्हा एकदा बाहेर काढले. हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध गुरुवारपासून मोहीम तीव्र करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत होती; परंतु अनेक दुचाकीस्वार हेल्मेट परिधान न करताच वाहन चालवत असल्याचे दिसून आले. शहरात दोन दिवसांत दोन हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई सुरू असून, ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी गुरुवारपासून विनाहेल्मेट वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली. प्रमुख चौकांमध्ये पोलीस विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करीत असल्याचे दिसून आले. पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, वाकड, हिंजवडी अशा सर्वच ठिकाणी कारवाई करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी या हेल्मेटसक्तीला विरोध करण्यात येत आहे. मात्र, तरीही वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात कोणतीही कसर ठेवण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. विरोध करणाऱ्या वाहनचालकांकडून लायसन्स जप्त करण्यात येत आहे. एका रात्रीत हेल्मेटसक्ती कशी लागू होऊ शकते, असा सवाल अनेक नागरिकांकडून विचारला जात आहे. शहरातील वाहतूक पोलिसांनी महिनाभर आधी नागरिकांचे प्रबोधन करावे, मगच महिनाभरानंतर दंडात्मक कारवाई सुरू करावी, अशा सूचनाही नागरिकांकडून होत आहेत.(प्रतिनिधी)दंड आणि जोखीम : शहर परिसरामध्ये वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर शुक्रवारी कारवाई केली. या वेळी वाहतूक पोलिसांना वैतागून दंडाचे पैसे देताना दुचाकीस्वार. इन्सेटमध्ये हेल्मेट खरेदी करण्यासाठी पिंपरीमधील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी.शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे पोलिसांचे काम आहे. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे. नियमित हेल्मेट वापरणे कधीही चांगलेच. शासनाने सक्ती केली, तरच हेल्मेट वापरण्यापेक्षा रोजच हेल्मेट वापरले पाहिजे. शहरात गुरुवारपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांंवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढे सुद्धाही कारवाई सुरूच राहणार आहे. - महेंद्र रोकडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
दोन हजार जणांना दंड
By admin | Published: February 06, 2016 1:34 AM