पवनानगर : सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जीवघेण्या घटना घडल्या असल्याचे संवानी पाहिले, वाचले आहे. मात्र सेल्फी प्रेम कमी होताना दिसत नसून, ‘माझ्याबरोबर असे होणार नाही’ असा फाजील आत्मविश्वास तरुणाईला मृत्युच्या खाईत ढकलत आहे. अशीच एक घटना पुणे शहराजवळील एका धरण क्षेत्रात घडली असून, त्यात दोन संगणक अभियंता तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहित अनिल जाधव (वय २८, सद्या रा. कोथरूड, मूळ- जळगाव) आणि वेदप्रकाश चंदलाल राणा (वय २८, सद्या रा. कोथरूड, रा. नागपूर) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत.
पुण्यातील एक सॉफ्टवेअर कंपनीमधील ९ तरुणांचा एक चमू काल शनिवार (दि.६) सायंकाळी विकएंड साजरा करण्यासाठी पवना धरण परिसरात मुक्कामी आला होता. तर आज रविवार (दि.७) सकाळी सगळेजण धरण परिसरात फिरत असताना, ठाकूरसाई पवना कॅम्प परिसरात दुपारी बाराच्या सुमारास पाण्याच्या बँग्राउंडवर सेल्फी घेत असताना, एक जण पाण्यात पडला. यावेळी पाण्यात पडलेल्या मित्राला आधार देऊन, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याचा मित्र देखील पाण्यात पडला. आयएनएस शिवाजी आणि शिवदुर्ग टीमने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून, लोणावळा पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.