पुणे : बोहरी आळीत चोरुन नायलॉन मांजा विक्री करणार्या व्यापार्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. जुनेद अकबर कोल्हापूरवाला (वय २९, रा. गणेश पेठ) व अदनान असिफअली सय्यद (वय १९, रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाने पक्षी व माणसांना होणार्या इजापासून सरंक्षण व्हावे, यासाठी या मांजाचा वापर करण्यास, जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक याबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांना बोहरी आळीतील दुकानदार चोरुन नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुकानात बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन छापा टाकला व दुकानातील नायलॉनचा मांजा जप्त केला आहे. दोघांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाची विक्री करु नये, जवळ बाळगु नये व वापर करताना कोणी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ व त्यांच्या सहकार्यांनी केली.