पुणे : शेतकऱ्याला पीक कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी बँकेचा विकास अधिकारी आणि वाडे बाल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सचिव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. वाघोली येथील जिल्हा बँकेच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
वाघोली शाखेचा विकास अधिकारी दीपक रामचंद्र सायकर (वय ३८) आणि वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सचिव गोपीनाथ दत्तात्रय इंगळे (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) मिळण्यासाठी वाडेबोल्हाई येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत अर्ज केला होता. तेथील सचिव गोपीनाथ इंगळे यांनी त्यांचा अर्ज जिल्हा बँकेच्या वाघोली कार्यालयात पाठविला असल्याचे सांगितले. इंगळे आणि पीडीसीसीचा विकास अधिकारी दीपक सायकर यांनी तक्रारदार यांच्याकडे कर्ज मंजूर करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली.
शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांच्या तक्रारीची १६ व २२ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या शेतकऱ्याकडे बुधवारी लाचेची मागणी करण्यात आली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथील पीडीसीसी कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडून दीपक सायकर याने ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सायकर व इंगळे यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.