लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि. ९) पहाटे दोन ट्रक व कंटेनर या तीन अवजड वाहनांच्या विचित्र अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर व क्लीनर ठार झाले. तर कंटेनरमधील एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात ट्रकमधील चालक अनिल अंकुश सूर्यवंशी (वय ३५ , रा. केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर) आणि क्लीनर शकील इस्माईल शेख (वय ३२, रा. बसवकल्याण, जि. बिदर, राज्य कर्नाटक) या दोघांचा मृत्यू झाला. तर कंटेनरमधील आण्णासाहेब गणपत गायकवाड (वय ४४, रा. मुंढवा, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोर झाला. अपघातातील कंटेनर हा पुणे-सोलापूर महामार्गावरून उलट दिशेने येऊन धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोरून सोलापूर-पुणे महामार्गाकडे वळत होता. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेला ट्रक हा त्याला धडकला. यामुळे ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. तर कंटेनरच्या केबिनची मागील बाजू चेंबली. याचवेळी आंध्र प्रदेशवरून पुण्याला फरशी घेऊन निघालेला ट्रक हा कंटेनरला धडकला.
तिन्ही अवजड वाहणे एकमेकांना धडकल्याने मोठा आवाज झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती कळवली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ट्रक ड्रायव्हर व क्लीनर मृत्युमुखी पडले होते. यामध्ये तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
फोटो अपघातग्रस्त ट्रक व कंटेनर.