दौंड : दौंड तहसील कचेरीच्या आवारातून बेकायदेशीर वाळूचे जप्त केलेले दोन ट्रक वाळूमाफियांनी दरवाजाचे कुलूप तोडून मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेले असल्याची माहिती पोलीस हवालदार एस. के. बोराडे यांनी दिली.याप्रकरणी तहसील कचेरीतील लिपिक अजित ढमे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर ट्रकचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ट्रक ( एमएच १२ सीटी ७८६0), (एमएच १४ सीपी ८७0६) या ट्रकमधून बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात होती. महसूल खात्याच्या पथकाने हे दोन्ही ट्रक पकडून तहसील कचेरीच्या आवारात लावले होते. साधारणत: एका ट्रकमध्ये चार ब्रास वाळू होती. त्यानुसार दोन्ही ट्रकमधील आठ ब्रास वाळू आणि ट्रकची किंमत अशी आठ लाख १३ हजार रुपयांची चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत. दौंड तहसील कचेरीतून बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारे ट्रक वाळू माफिया पळवून नेत आहेत, ही बाब कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे. पकडलेल्या ट्रकच्या टायरची हवा काढली होती; मग वाळू माफियांनी ट्रक पळविले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ट्रक चोेरट्यांनी स्टेपनीच्या साह्याने चाक बदलून दोन्ही ट्रक पळविले; मात्र वाळू माफियांचे धाडस संगनमताशिवाय होऊ शकत नाही, असे बोलले जात आहे. महसूल खात्याने ट्रकचोरी प्रकरणी अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीत ट्रकचे नंबर दिले आहे. या नंबरवरून ट्रकमालकाचा शोध महसूल खात्याला पोलिसांच्या मदतीने लागू शकतो. त्यानुसार चोरीला गेलेले ट्रक हाती लागू शकतात. संगनमताने ट्रक पळविले?दौंडच्या तहसील कचेरीतून ट्रक पळवून नेण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दहावी घटना असल्याचे बोलले जाते. सध्याच्या परिस्थितीत ट्रक पळवून नेऊ नये म्हणून ट्रकची हवा काढली जाते. मात्र, या दोन ट्रकची हवा का काढली नाही, यावरून सदरचे ट्रक संगनमताने वाळूमाफियांनी पळवले असल्याची परिसरात चर्चा आहे.तहसील कचेरीच्या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी दोन पोलीस द्यावेत, अशी मागणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जेणेकरून भविष्यात या प्रकाराच्या घटनांना आळा बसेल. तसेच ट्रक कसे चोरीला गेले, याबाबत चौकशी केली जाईल. - विवेक साळुंके, तहसीलदार
दौंडला तहसील कचेरीतून वाळूचे दोन ट्रक पळविले
By admin | Published: September 04, 2016 4:04 AM