लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आजचा गुरुवार हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अमृतांजम पुलाजवळ किमी नं 45/600 जवळ घडली. याठिकाणी ट्रक (नं एमएच-46- अेआर-5135) याचे इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आगीने पेट घेतल्याने ट्रकच्या आतील केबिन व बोनेट जळाले. लोणावळा शहर पोलीस व रस्ते विकास महामंडळाच्या पथकाने सदरची आग विझवत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले.दुसरी दुर्घटना ही खोपोली हद्दीत ढेकू गावाजवळ घडली. यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या पुलावरून एक टँकर खाली पडल्याने त्याला आग लागली व त्याने पेट घेतला. ही आग ऐवढी भयंकर होती की सर्वत्र धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत होत्या. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती समजताच देवदूत, डेल्टाफोर्स, बोरघाट पोलीस, हायवे पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटल टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम, हायवे पोलीस यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दोन्ही घटनांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 8:46 AM