आळे फाटा (पुणे) : गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आळेफाटा परिसरात आलेल्या दोन जणांना आळे फाटा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले. प्रवीण निचीत (वय ४५, रा. वडनेर खुर्द, तालुका शिरूर) व सुरेश मुपनार (वय ३८, रा. पिंपरी पेंढार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
आळे फाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी परिसरात बुधवार (दि. १५) रोजी दुपारनंतर गावठी पिस्तूल विक्री करण्यास काही इसम येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे यांना मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलाकस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगडे व लहानू बांगर यांचे पथकाने बसस्थानक व परिसरात सापळा लावला. पाच वाजेच्या सुमारास चौकापासून जवळच असलेल्या चहाच्या दुकानाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले.
दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नावे विचारले असता त्यांनी पिस्तूल हे विक्री करण्यासाठी आळे फाटा येथे आणले असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली, तर यातील प्रवीण निचीत हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत.