पुणे: स्पर्धा परीक्षेच्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करणे. ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. परीक्षा वेळेवर न होणे. तसेच रखडलेल्या नियुक्त्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने योग्य पाऊले उचलून एमएससीबाबत नियोजन करावे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेतच. आता तिसरी लाट ही विद्यार्थ्यांची आत्महत्येची असेल. असा इशारा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. अनास्थेचा बळी ठरलेल्या सरकारने आतातरी वेळेवर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून स्वप्नील लोणकर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट म्हटले आहे. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.
विद्यार्थिनी संध्या सोनवणे म्हणाली, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी ,मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वेळेवर परीक्षा न घेतल्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे ,यामुळे येणाऱ्या काळात अश्या घटना उद्भवू नये. यासाठी एमपीएससी ने यूपीएससी च्या पावलावर पाऊल ठेऊन वेळेवर आणि नियोजन करून परीक्षा घेतल्या पाहिजेत.''
''२०१९ ला जाहीरात आलेली गट ब ची परीक्षा ५- ६वेळेस पूढे ढकलण्यात आली. ती अजूनही झालेली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेली वय आणि कर्जाचा डोंगर ह्यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आलेले आहेत. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींना आयोगाच्या कारभारामुळे आणि त्यामूळे होणाऱ्या आर्थिक अडचणीमूळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहीरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे. अशी मागणी विद्यार्थी राम लेंडेवाड याने केली आहे.''
''सरकार कडून एमपीएससीसाठी वेळेवर मागणी पत्र प्राप्त होत नाही. त्यामुळे परीक्षाही वेळेवर होत नाहीत. तसेच एमपीएससीची पाच सदस्य एक अध्यक्ष अधिक अशी रचना असताना गेली तीन वर्ष फक्त एक अध्यक्ष व एक सदस्य मिळून कारभार पाहत आहे.त्यामुळे ना निकाल वेळेवर लागतो ना परीक्षा वेळेवर होतात. म्हणून हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. सरकारने आतातरी वेळेवर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. असे विद्यार्थी निलेश निंबाळकर याने सांगितले आहे.''
स्टुडंट हेल्पींग हँड अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणाले, आत्महत्या नसुन एक प्रकारे व्यवस्थेकडून झालेला खुनच आहे. असे सञ गेल्या तीन वर्षांपासून सतत चालूच आहे. राज्यकर्त्यांच्या धोरण लकव्यामुळे हे प्रकार घडतात. मग कोणतेही शासन असो - आधीचे किंवा आत्ताचे, वर्षानुवर्षे फटका मात्र विद्यार्थ्यांनाच बसत आला आहे. परीक्षा पास झाल्यावर देखील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जुन्या मंडळींकडून अपेक्षा ठेवणे कठीण आहे. पण राज्याच्या युवा नेतृत्वाने पक्ष, संघटना या सर्वांपलीकडे जाऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा असे अनेक स्वप्नील आत्महत्येच्या उंबरठयावर आहेत हे लक्षात त्यांनी घ्यावे.