विमाननगर : परदेशी युवतीसह आणखी एका युवतीकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या दोन दलालांना विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. विशाल महादू निरमळ (वय २६,रा.वडगाव मावळ) व कृष्ण प्रकाश नायर (वय ३२,रा.भूमकर चौक वाकड) या दोन दलालांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथिदार गणेश, रेणू नेपाली व विशाल हे फरार आहेत. याप्रकरणी दोन पिडीत युवतीनां ताब्यात घेऊन त्यांची रवानगी रेस्क्यू होम मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये उजेबेकिस्तान येथील एका परदेशी युवतीचा समावेश आहे. अटक आरोपींना ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात वेश्याव्यवसायासाठी परदेशी युवतींना दलाला मार्फत आणण्यात येत असल्याची माहिती पोलीस शिपाई स्वप्निल जाधव व अविनाश संकपाळ यांना मिळाली होती. त्यानुसार विमाननगर परिसरातील एका हाॅटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून सापळा रचून दोघा दलालांना जेरबंद करण्यात आले. याठिकाणी एका परदेशी युवतीसह आणखी एका युवतीला बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणण्यात आले होते. बनावट गिऱ्हाईकामार्फत पिडीत महिलांपर्यत पोहचल्यानंतर त्यांच्या दलालांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला. पिडित युवतींकडून मिळालेल्या अधिक माहितीवरुन दलाल विशाल निरमळ व कृष्णा नायर या दोघांना भूमकर चौक वाकड येथे सापळा रचून अटक करण्यात आली. अधिक तपासात या व्यवसायातील मुख्य सूत्रधार रेणू नेपाळी व विशाल यांच्या सांगण्यावरुन आम्ही या व्यवसायात काम करतो. त्यातील मोबदला ते आम्हाला देत असल्याची कबूली दिली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार पाच दलालांविरुध्द गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी रोख पाच हजार रुपये, दोन मोबाईल, एक इंडिगो कार हस्तगत केली आहे.
पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु,सहाय्यक आयुक्त डाँ.शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक गुन्हे बळवंत मांडगे,सहाय्यक निरीक्षक मुरलीधर खोकले,पोलिस कर्मचारी स्वप्निल जाधव,अविनाश सकंपाळ,प्रदिप मोटे,संदेश शिवले,महिला कर्मचारी साधना पवार, पूजा नाईक यांच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली.अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे बळवंत मांडगे करीत आहेत.