धनकवडी : धनकवडीत दहशत करून दोन दुचाकी पेटवल्या प्रकरणी आरोपींना सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले. पेट्रोल चोरीचा आळ घेतल्याच्या संशयावरून दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून दोन दुचाकी पेटवून दिल्याची घटना धनकवडी भागात गुरुवारी मध्यरात्री घडली होती. राम कटके (वय ३२, रा. धनकवडी) यांनी या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी शुभम विलास भगत (वय २०, रा. जिजाबा चव्हाण चाळ, धनकवडी) आणि महेश अनिल साळुंखे (वय २४, रा. रामचंद्रनगर, जयनाथ चौक, धनकवडी) असे दोघांना अटक करण्यात आले.
राम कटके आणि संदीप दरेकर यांनी धनकवडी गावातील जयनाथ तालीम मंडळाजवळील मोकळ्या जागेत दुचाकी लावल्या होत्या. आरोपी भगतने दुचाकीतील पेट्रोल चोरल्याचा संशय कटके यांना होता. या कारणावरून भगत आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार मध्यरात्री अडीचच्या सुमारास जयनाथ तालीमजवळ आले. दोघांनी शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. पेट्रोल चोरीचा आळा का घेतात ? अशी विचारणा करून दोघांनी परिसरात दहशत निर्माण केली. कटके यांना शिवीगाळ करून दुचाकी पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक झोपेतून जागे झाले. आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. या घटनेमुळे कटके घाबरले. काही वेळानंतर आरोपींनी संदीप दरेकर यांची दुचाकी पेटवून दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सहायक पोलीस निरीक्षक किरण मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप बेडिस्कर व महेश मंडलिक यांना खबर मिळाली की दोन इसम धनकवडी येथील अष्टद्वार चौकात पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेटची ज्युपिटर गाडीवर कोणाची तरी वाट पाहत थांबले आहेत. तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले.
ही कामगिरी सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक किरण मदने, तपास पथकातील पोलीस हवालदार बापू खुटवड, विजय मोरे, पोलीस नाईक प्रकाश मरगजे, सतीश चव्हाण, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, किसन चव्हाण, प्रदीप बेडीस्कर, शिवलाल शिंदे, शिवा खेड यांनी केली.