लोणी काळभोर : पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर एमआयटी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकीवरून लोणी काळभोरच्या दिशेने जात असताना टॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याचा एकवीस वर्षीय साथीदार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
शुक्रवारी (दि.०८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एमआयटी चौकात ही घटना घडली आहे.अथर्व कैलास पाटोळे (वय - २१, रा. नाशिक, सध्या लोणी काळभोर, ता. हवेली) हे त्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अर्थवचा सहकारी रोहित अनिल पगार (वय - २१) हा अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व पाटोळे व रोहित पगार हे एमआयटी या शौक्षनिक संस्थेत मागील वर्षापासुन शिक्षण घेत आहेत. अथर्व हा आयटीत तर रोहित हा सीएसईत शिक्षण घेत होता. तसेच ते लोणी काळभोर येथील एका सोसायटीत दोघेही एकत्र राहतात. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एमआयटी कॉर्नरवरुन लोणी काळभोर बाजुकडे निघाले होते. कॉर्नरपासुन पुढे पन्नास फुट अंतरावर गेले असता, त्यांच्या दुचाकीने पाठीमागून ट्रक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी ही दुभाजकाला धडकून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडली. यामध्ये अथर्व व रोहित महामार्गावर पडले. यावेळी अथर्व याच्या डोक्याला जबर मार लागला, तर रोहित याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी आरती खालचे यांनी वाहतूक थांबवून रुग्णसेवेला फोन करून त्यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात पाठवले. दरम्यान, दोघांनाही लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान अथर्व याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच त्याचा साथीदार रोहित पगार याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस कर्मचारी बालाजी बांगर यांनी भेट देऊन पंचनामा केला.