लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव/ राजगुरूनगर : पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करीत स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींकडून तब्बल ८ लाख ७० हजार रुपये किमतीच्या २० मोटारसायकली गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आळेफाटा, शिरूर, खेड, ओतूर, नारायणगाव, यवत आणि नगर जिल्ह्यातील पारनेर भागात मोटारसायकल चोरीच्या असंख्य घटना वाढल्या होत्या. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार नारायणगाव पोलीस ठाण्याच्या मोटारसायकल चोरीचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, किरण पिंपळे हा त्याचा साथीदार प्रवीण बाचकर याच्या सोबत चोरीच्या मोटारसायकली घेण्यासाठी आदित्य निकम नावाच्या इसमाकडे रांजनी (ता. आंबेगाव) येथील कारफाटा येथे येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कारफाटा येथे सापळा लावला असता, एक इसम विनानंबरच्या मोटारसायकलीसह संशयितरित्या फिरताना आढळून आला. थोड्याच वेळात अन्य दोघे मोटारसायकलींवर त्याठिकाणी आले. पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे किरण भास्कर पिंपळे (वय २५, रा. दरडगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर), प्रवीण नामदेव बाचकर (वय २८, रा. कानगर, ता. राहुरी, जि. अहमदनगर) आणि आदित्य दत्तू निकम (वय १९, रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे) असे सांगितले. यापैकी आदित्य निकम याच्याकडे चोरीच्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा साथीदार रोहित गुंजाळ व अर्जुन पवार यांच्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोटारसायकली चोरी केल्या असून, चोरलेल्या गाड्या आम्ही किरण पिंपळे, प्रवीण बाचकर, कैलास येळे यांच्याकडे विक्रीस देत असल्याचे कबूल केले.
चोरलेल्या ८ लाख ७० हजार रुपयांच्या एकूण २० मोटारसायकली आदित्य निकम, किरण पिंपळे, प्रवीण बाचकर, कैलास येळे यांच्याकडे मिळून आल्या. पोलीस पथकाने त्या ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, दिपक साबळे, सचिन गायकवाड, मुकुंद कदम, पोलीस नाईक संदीप वारे, दिनेश साबळे, शिपाई अक्षय नवले, नीलेश सुपेकर, दगडू वीरकर, सचिन कोबल यांनी केली आहे.
फोटो : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींकडून तब्बल ८ लाख ७० हजार रुपये किमतीच्या २० मोटारसायकल जप्त केल्या.