शेलपिंपळगाव : कॉलेजहून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तन्मय पंकज हरगुडे (वय १८ रा. साबळेवाडी ता. खेड) व ओंकार कैलास साबळे (वय १८ रा. बहुळ ता. खेड) असे अपघातातमृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेने साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे.
सदरचा अपघात चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील कडाचीवाडी हद्दीत सायंकाळी तीनच्या सुमारास झाला. तन्मय व ओंकार कॉलेजहून आपल्या दुचाकीने घरी जात होते. मात्र कडाचीवाडी हद्दीत पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी स्थानिक तरूणांनी धाव घेऊन नातेवाईकांच्या मदतीने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तन्मयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तन्मयच्या पाठीमागे आजी - आजोबा, आई - वडील, भाऊ, चुलते, नातेवाईक असा परिवार आहे. बहुळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन पंकजबाप्पू हरगुडे यांचे ते चिरंजीव होते. तर ओंकार हा सामाजिक कार्यकर्ते कैलास बाजीराव साबळे यांचा ते पुत्र होत.