पुणे : पतंगाच्या प्लास्टीक मांज्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्याचे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडत आहेत. मांज्यामुळे गळाच चिरला जात असल्याने दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतल्याच्याही घटना घडल्या आहेत. पतंगाच्या प्लास्टिक मांज्यावर बंदी असतानाही त्याचा वापर होताना दिसतो. त्यामुळे या मांज्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
आळंदी रस्त्यावर येरवड्यातील फुलेनगरमध्येही मंगळवारी (दि. ८) दुपारी एकच्या सुमारास अशाचप्रकारे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सुदैवाने या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान दाखवल्याने त्याच्या गळ्याऐवजी जबड्यावर निभावले. या घटनेत चंद्रकांत जगन्नाथ नाईक (वय ४०, रा. पंचशील नगर, जेल रस्ता, येरवडा) असे या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाईक हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्याकडून 'आरटीओ' कार्यालयाच्या दिशेने जात होते. त्यावेळी फुलेनगरमध्ये काही मुले पतंग उडवत होती. यातील एक पतंग रस्त्यावर पडत असताना नाईक यांच्या गळ्याला मांजा लागला. त्याचक्षणी एका हातात दुचाकी सावरत त्यांनी दुसऱ्या हाताने मांजा बाजूला केला. मात्र तरीही मांजा जबडल्याला घासल्याने नाईक यांचा जबडा चिरला गेला. यामध्ये ते जबर जखमी झाले. त्यांच्या फाटलेल्या ओठांवर खाजगी रुग्णालयात टाके घालून उपचार करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते हर्षद जाधव म्हणाले, पतंगाच्या मांज्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. मागील काळात अशा घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी गेले आहेत. विक्रेते तुटपुंज्या आर्थिक फायद्यासाठी प्लास्टिक मांज्याची विक्री करतात. मात्र यामुळे नागरिकांचा जीव जातो अथवा गंभीर प्रसंग ओढवतात. विक्रेत्यांनी स्वतःहून प्लास्टिक मांज्याची विक्री बंद करावी. पोलिस अथवा शासनाने या मांज्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.