पुणे/ धायरी : अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ओंकारसिंग अभयराजसिंग ठाकूर (वय: ३६ वर्षे, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वारजे पुल ते मुठा पुलादरम्यान घडली.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकारसिंग ठाकूर हे सुतारकामाचा व्यवसाय करत असत. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून वारजेच्या दिशेकडून नवले पुलाच्या दिशेने जात होते. वारजे पुलाजवळील हॉटेल हरिओम जवळ ते आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक सणस व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
हेल्मेटसह झाला डोक्याचा चेंदामेंदा...
अपघात घडल्यानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मयत ओंकारसिंग यांनी डोक्याला हेल्मेट घातले होते. मात्र हेल्मेटसह त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.
महामार्गावरच असते फळ विक्रेत्यांची गर्दी...
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे पुल ते मुठा नदी पुलादरम्यान अनधिकृतपणे फळ विक्रेते उभे असतात. अगोदरच अरुंद असलेला रस्ता अन् त्यात फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण यांमुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.