गुन्हे शोधपथकाची कारवाई : चोरीच्या सात दुचाकी केल्या जप्त
बारामती : शहरासह वालचंदनगर परिसरातील दुचाकी चोरी उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुचाकी चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शोधपथकाची कारवाई करीत चोरीच्या सात दुचाकी केल्या जप्त केल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीचोरीचे गुन्हे वाढल्याने गुन्हे शोधपथकाचा तपास सुरु होता. खब-यांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली. दरम्यान त्याने साथीदारांसह दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
दुचाकी चोरीमध्ये अल्पवयीन मुलासह त्याचे साथीदार अमर मोहम्मद तांबोळी (वय २४, रा. तांदुळवाडी, बारामती, जि. पुणे), अल्ताफ ऊर्फ ओंकार जीमर शेख (वय २०, रा. खंडोबानगर, बारामती, जि. पुणे) यांनी मिळून बारामती शहर व वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तपासादरम्यान २ लाख ६० हजार रुपयांच्या एकुण ७ दुचाकी गुन्हे शोधपथकाने जप्त केल्या आहेत. यामध्ये बारामती शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे ६ गुन्हे तर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचा एक गुन्हा असे एकुण सात दुचाकी चोरीचे गुन्हे शोधपथकाने उघडकीस आणले.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके, रामचंद्र शिंदे, सुहास लाटणे, संजय जाधव, पो. कॉ. अकबर शेख, दशरथ इंगोले, अजित राऊत, तुषार चव्हाण यांनी ही कारवाई केली.
फोटो ओळी - बारामती गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, कर्मचारी जप्त केलेल्या दुचाकी आणि आरोपीसह छायाचित्रात दिसत आहेत.
१२०८२०२१-बारामती-०५