लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.
सम्या ऊर्फ समीर दत्तात्रय रांगावकर (वय ३४, रा. विमाननगर, मूळ रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ४ लाख १० हजार रुपयांच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. रांगावकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
मागील महिन्यात सचिन घुले (वय ३०, रा. पानमळा दत्तवाडी) यांची दुचाकी सकाळी सव्वानऊच्या सुमारास नवी पेठेतील इंदुलाल कॉम्पलेक्सच्या बाहेर पार्क करून ठेवली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी करून पळ काढला होता. गुन्हे शाखेच्या युनिटचे पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा ही दुचाकी एक व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसले. अधिक तपास केला तेव्हा ही चोरी समीर रांगावकर याने केल्याचे समजले. पोलिसांना रांगावकर हा नवी पेठ निंबाळकरवाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा त्यानेे विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.त्याच्याकडून ४ लाख १० हजार रुपयांच्या १७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलूस निरीक्षक शैले संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, कर्मचारी अमोल पवार, इम्रान शेख,अशोक माने, विजय थोरात, अनिकेत बाबार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.