पुणे : रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईतास समर्थ पोलिसांनी अटक केली. आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांच्या न्यायालयाने ७ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शंकर भरत देवकुळे (वय २८ , रा. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. देवकुळे विरोधात शहरातील सहा पोलीस ठाण्यांत १४ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून, त्याच्या ताब्यातून २ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही घटना ११ ते १२ डिसेंबर २०१८ दरम्यान रास्ता पेठ परिसरात घडली. येथील रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले.
सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी युक्तिवाद केला की, देवकुळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने चोरी केलेल्या दुचाकी त्याचे मित्र व ओळखीच्या लोकांकडे ठेवल्या आहेत. पुणे शहर व पिंपरी- चिंचवड भागातून त्याने आणखी दुचाकी चोरल्याची दाट शक्यता असून, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी. न्यायालयाने ती मान्य केली.