पुणे . भावासोबत दुचाकीवर प्रवास करताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावले. ही घटना गुरूवारी (दि.२७) संध्याकाळी ५ च्या सुमारास पाषाण परिसरातील सुतारवाडीत घडली. याप्रकरणी प्राची सुतार (वय २४ ) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी घटना पाषाणमधील बालाजी चौकात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दुचाकीवरून घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी सुजाता शिंदे (वय ४० ) यांनी तक्रार दिली आहे. दोन्ही चोरीच्या घटना काही वेळात घडल्यामुळे परिसरातून प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुचाकीस्वार महिलांना लक्ष्य करून चोरट्यांकडून दागिने हिसकाविले जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चोरट्यांनी कात्रजमध्ये घरफोडी करून ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी मंगल पवार यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.