पुणे : आर. सोल्यूशन्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावर बँकेपेक्षा अधिक दराने परतावा देण्याच्या आमिषाने १ कोटी रुपयांची फसवणूक करणा-या दोन महिलांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अंजली रवींद्र गायकवाड (वय ४९, रा़ कर्वेनगर), सारिका संग्राम तांगुदे ऊर्फ सारिका रवींद्र गायकवाड (वय २९, रा़ नांदेड सिटी, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत.कंपनीचे संचालक रवींद्र गायकवाड व इतर संचालकांविरोधात १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल कोथरुड पोलीस ठाण्यात ठेवीदारांचे हितसंबंध कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायातील भागीदाराच्या ओळखीने या महिलेची रवींद्र गायकवाड याच्याशी २००५ मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर २०११ मध्ये तो पत्नीसह त्यांच्या घरी आला. त्यानंतर त्याने आऱ सोल्यूशन्स नावाची कंपनी सुरू केली असून रत्नागिरी व चिपळूण येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्यांना मोठी कामे मिळाली आहेत, असे सांगितले. तेथील अभियंता हे त्यांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे तेथील कामाचे टेंडर त्यांना मिळत आहे. या कामाकरिता गुंतवणूक करा व गुंतवणूकदार शोधा, असे त्यांना सांगून गुंतवणूक करवून घेऊन फसवणूक केली. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या करीत असताना गायकवाड याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशनवरून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांचे मोबाईल बंद असल्याने त्यांच्या घराजवळ पोलिसांनी सापळा लावला. त्यानंतर अंजली गायकवाड व सारिका गायकवाड या दोघींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह, सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, सहायक पोलीस फौजदार खरात, पोलीस नाईक अभंगे, भागवत यांच्या पथकाने केली.>बनावट कंपनीची स्थापना२ ते ३ वर्षे गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात बँकेपेक्षा जास्त १६ टक्के दराने व्याज देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी आर. सोल्यूशन्स नावाची बनावट कंपनी स्थापन करून त्या कंपनीचे संचालक असल्याचे त्यांनी भासवले. त्यानंतर कंपनीत मोठ्या रकमांची गुंतवणूक करून घेतली. त्याचे लेखी हमीपत्र दिले. त्यानंतर ठेवींबाबत मूळ रकमेचा एक पुढील तारखेचा धनादेश दिला. मात्र मुदत संपल्यानंतर ठेवीदारांनी बँकेत चेक जमा केले असता ते वटले नाहीत. त्यामुळे गायकवाड व त्यांच्या पत्नींशी संपर्क साधल्यावर त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या दोन महिला गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 1:48 AM