कोरेगाव भीमा : मशीनवर काम करीत असताना जॉब उडून जखमी झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सणसवाडी (ता. शिरुर) येथिल पी. वाय. एन. अॅटो कारखान्यामध्ये घडली. यानिमित्ताने कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आॅपरेटरचे रुपेश कुमार ब्रिजकिशोर सिंग (वय २८, रा. जलपुरवा, जि. शिवान, बिहार ) व काळुराम किसन साळूंके (वय ४५, रा तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर) अशी मृतांची नावे आहेत. सुपरवायझर सचिन ज्ञानेश्वर सावंत (वय ३५ वर्षे रा. वढु बुद्रुक (ता. शिरुर) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पी. वाय. एन. अॅटो कारखान्यातील एकूण ७० कामगार काम करतात. गुरुवारी सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कारखान्यात २० हेल्पर व २५ मशिन आॅपरेटर काम करीत होते. सकाळी आठच्या सुमारास सावंत हे कारखान्यातील फलक अपडेट करीत असताना मशिनचा मोठा आवाज झाला. ते तात्काळ आवाजाच्या दिशेने पळत गेले. त्याठिकाणी साळूंके व सिंग जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यातील सिंग यांच्या मानेवर जखम झालेली होती. त्यामधून रक्तस्त्रावर होत होता. तर साळूंके यांच्या डोक्याला पाठीमागे मार लागलेला होता. त्यांना तात्काळ उपचारसाठी शिक्रापूर येथिल खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांनी यातील सिंग यांना मृत घोषित केले. जखमी अवस्थेतील साळूंके यांना वाघोली येथील दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचाही मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश वारुळे करित आहेत.