अवसरी (पुणे): शिंगवे (ता. आंबेगाव) गाढवेवस्ती येथील दोन वर्षीय कृष्णा विलास गाढवे हा लहान मुलगा सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घराच्या अंगणातून गायब झाला होता. परिसरातील नागरिक वनविभाग पोलिस रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन कृष्णा सापडला नसल्याने शोध कार्य अंधारामुळे थांबविले होते. मात्र मंगळवारी सकाळी घराशेजारील गोबर गॅसच्या खड्ड्यात कृष्णाचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. आई-वडिलांना कृष्णा हा एकुलता एक मुलगा असल्याने गाढवे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
शिंगवे येथील गाढवे वस्तीत घरासमोर खेळणारा कृष्णा गाढवे हा कालपासून बेपत्ता झाला असल्याची घटना घडली होती. या मुलाला बिबट्याने पळवून नेल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरु होती. त्यासाठी वनविभागाने येथील ऊस शेतात मुलाला शोधण्याची मोहीम सुरु केली होती. मात्र काल दिवसभर शोधूनही मुलाचा पत्ता लागला नव्हता. त्यानंतर आज सकाळी गाढवे कुटुंबीय मुलाचा शोध घेत असताना सकाळी आठ वाजता घराच्या बाजूला असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत लाल रंगाचे काहीतरी तरंगले दिसले. त्यावेळी कुटुंबियांनी पाहिले असता कृष्णा गाढवे या लहानग्याचा मृतदेह आढळून आला.
मुलगा खेळता-खेळता गोबर गॅसच्या टाकीत पडला याचा अंदाज सांगितला जात आहे. या घडलेल्या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. कृष्णा याचा मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.