पुणे : रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणा-या दोघांना न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सराफ यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोनसाखळीचोरीच्या २ विविध गुन्ह्यांत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.हैदर सलीम इराणी (वय २०) व समीर शब्बीर इराणी ऊर्फ समीर संपत भंडारी (वय २०, दोघेही रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ८ एप्रिल २०१६ रोजी सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली होती. यासंबंधी एका ज्येष्ठ महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी त्या सोसायटीच्या मैदानात नेहमीप्रमाणे व्यायामासाठी निघाल्या होत्या. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या २ आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील फिर्यादी या येथील पापड कंपनीला पीठ पुरविण्याचे काम करतात. ८ आॅक्टोबर २०१५ रोजी पहाटेच्या सुमारास त्या स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण टॉकीज येथे कंपनीच्या गाडीची वाट बघत उभ्या होत्या. यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांची गळ्यातील सोनसाखळी लंपास केली होती. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली.संजय दीक्षित यांनी ७ साक्षीदार तपासले. न्यायालयाने फिर्यादी व पोलीस यांची साक्ष ग्राह्य धरत दोघांना २ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सोनसाखळीचोरांना २ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:34 AM