--
केडगाव :
केडगाव स्टेशन येथील स्मशानभूमीमध्ये दोन युवक ग्रामपंचायत सदस्यांनी अज्ञात कोरोनाबाधित तीन मृत व्यक्तींचा सावडण्याचा कार्यक्रम केला. स्मशानभूमीतील अस्थी विसर्जन करत स्मशानभूमीची साफसफाई केली. ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ व नितीन जगताप असे या युवकांचे नाव आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की,
गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी स्टेशन स्मशानभूमी येथे करण्यात आला. परंतु आठ दिवसांनंतरही अस्थी गोळा करण्यासाठी अंत्यविधी झालेल्या रुग्णांचे कोणीही नातेवाईक आले नाही. खरेतर अस्थिविसर्जन दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी होत असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अंत्यविधी करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यांना अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. केडगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने या स्मशानभूमीत यापूर्वीच तीन अनोळखी मृतदेहांचे राख व अस्थी अस्ताव्यस्त पडल्याने अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यांना दूर जाऊन दुसरीकडे अंत्यविधी करावा लागल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ व ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी पुढाकार घेऊन ३ अज्ञात कोरोनाबाधित सावडण्याचा विधी केला व स्मशानभूमी स्वच्छ केली. येथील राख व अस्थी शेजारील बंधाऱ्यामध्ये विसर्जित केली. युवकांच्या या उपक्रमांमुळे केडगाव स्टेशन येथील स्मशानभूमी आता स्वच्छ झाली आहे. त्यामुळे इतर पार्थिवांच्या अंत्यविधीसाठी मोकळी जागा निर्माण झाली आहे. या कार्याने दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
--
फोटो क्रमांक : १२ केडगाव युवक अस्थी गोळा
फोटो ओळी : केडगाव स्टेशन येथील स्मशानभूमी मध्ये अज्ञात कोरोनाबाधित व्यक्तींचा सावडण्याचा कार्यक्रम करताना ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ व नितीन जगताप.