धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांजवळ विनापरवाना चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे आढळल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिध्देश संतोष पाटील (वय:२८ वर्षे, सध्या रा. जाधवनगर, वडगाव बुद्रक, पुणे, मुळगाव : मोहोप्र, पो. बुर्ली, ता: महाड, जिल्हा: रायगड) व विकास सुभाष सावंत (वय:२६ वर्षे, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रक पुणे, मुळगाव मुं. सावंतवाडी, पो: लव्हरी, ता: केज, जिल्हा: बीड) अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयित व्यक्ती व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व पोलीस अंमलदार सागर शेडगे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सिध्देश पाटील व त्याच्यासोबत त्याचा मित्र विकास सावंत यांच्याकडे गावठी पिस्टल आहेत. ते दोघेही हिंगणे खुर्द येथील कॅनोल रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कट्ट्यावर बसले आहेत. याबाबत वरिष्ठांना माहिती कळवून सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम व त्यांच्या टीमने त्या ठिकाणी गेले असता, पोलिसांना पाहतच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ १ लाख ६० हजार रुपयांचे चार गावठी पिस्टल व ४ हजार रुपये किंमतीचे आठ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस अंमलदार संजय शिंदे, राजु वेंगरे, चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, दक्ष पार्टी स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांच्या पथकाने केली.