पुणे : उपनगरात वैमनस्य, तसेच किरकोळ वादातून सामान्यांच्या वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बिबवेवाडीत किरकोळ वादातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच धायरीतील एका सोसायटीतील दोन दुचाकी, दोन सायकली पेटवून देण्यात आल्याची घटना घडली.
पूर्ववैमनस्यातून एकाने नऱ्हे-धायरी रस्त्यावर असलेल्या वैष्णवी अंगण सोसायटीच्या आवारातील दोन दुचाकी, दोन सायकली पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी अतुल रवींद्र दांगट (रा.दांगटनगर, शिवणे) याला अटक करण्यात आली आहे. एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. दांगटने केलेल्या जाळपोळीत सोसायटीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणारी वायरिंग जळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक खेडकर तपास करत आहेत.
बिबवेवाडीतील नीलकमल सोसायटीत घराच्या समोरून जाणाऱ्या रस्त्याच्या वापरावरून किरकोळ वाद झाला होता. या वादातून दोन दिवसांपूर्वी पहाटे साडेतीनच्या सुमारास ७ ते ८ जणांनी एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. नीलकमल सोसायटीच्या आवारातील मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या. याबाबत युवकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी.जी. यादव तपास करत आहेत.
महर्षिनगर, कात्रज भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.