नम्रता फडणीस
पुणे : सुख, शांती, समृद्धी नांदत असलेल्या घरात अचानक काही चित्र-विचित्र घटना घडल्या की, त्याचं खापर पत्नीवर फोडत तिला पांढऱ्या पायांची समजण्यापासून ते माहेरच्यांकडून गाडी, पैसा आणण्यासाठी छळापर्यंत अत्याचाराच्या घटनांमध्ये कोरोनानंतर वाढ झाली आहे. पुण्यात २०२१ मध्ये विवाहितेला क्रूर वागणूक दिल्याचे ३२७ गुन्हे दाखल झाले आहेत. २०२० मध्ये ही संख्या २६२ इतकी होती.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक २५ पैकी एक महिला तिच्या पतीकडून अनेकदा लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना ठाण मांडून बसला आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. पगार निम्म्यावर आला. त्यामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले. स्त्री ही पतीसह सासरकडच्यांचे लक्ष्य बनली.
सतत भांडण, वादविवादासह पुरुषी हक्क गाजविण्यासाठी लैंगिक छळापासून ते अनिच्छेने केल्या जाणाऱ्या शारीरिक संबंधाद्वारे बलात्काराच्या घटनाही समोर आल्या. मात्र, कायद्यात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरविला जात नसल्याने अशा प्रकारच्या शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या अनेक घटना या कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गतच नोंदविल्या जात आहेत. विवाहित महिलांना क्रूर वागणूक देण्याचे प्रमाण कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत अधिक वाढल्याचे समोर आले आहे.