पुणे : शहरात टायफाॅईड, डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शहरात लहानांपासून माेठयांपर्यंत ताप येण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, या आजाराचे निदान हाेण्यात वेळ जात आहेच. साेबत हे आजार बरे हाेण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान, दुषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव या दाेन कारणांमुळे ही संख्या वाढत असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे. गेल्यावर्षी जितकी रुग्णसंख्या हाेती त्याच्या आसपासच यावर्षीही रुग्णांची संख्या आहे.
जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाला शहरात सूरूवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेली असली तरी मात्र, डासांची वाढ मात्र, माेठया प्रमाणात झाली आहे. शहरासह उपनगरांमध्येही डासांची वाढ सातत्याने हाेत आहे. त्यामुळे, त्यापासून पसरणा-या डेंग्यू मलेरिया या कीटकजन्य आजारांचे प्रमाणही वाढत चालले आहे. तसेच, दुषित पाण्यामुळे काॅलरा, कावीळ, डायरियाचेदेखील रुग्ण वाढत आहे.
यावर्षी जानेवारीपासून जून पर्यंत टायफाॅइडचे ११ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ९ जणांना टायफाॅईड झाल्याचे निदान करण्यात आले आहे. हे सर्वच रुग्ण मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथील आहेत. एकाच इमारतीतील ५ ते १० वर्षे वयोगटातील ११ मुलांना कमला नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तसेच काेंढवा परिसरातही काही रुग्ण आढळून आलेले आहेत.
टायफाॅईड काय आहे?
टायफाॅईड हा साल्माेनेला एंटेरिक सेराेटाईप टायफी या जीवाणुमुळे हाेताे. त्याची लागण ही दुषित पाण्यामुळे किंवा दुषित अन्न खाल्ल्याने हाेते. यामध्ये ताप, अंगदुखी तसेच पायात वेदना ही लक्षणे दिसून येतात. तसेच हा ताप एक ते दाेन आठवडे राहू शकताे आणि तितकाच कालावधी हा बरे हाेण्यासाठी लागु शकताे. प्रामुख्याने पाेटात याचा संसर्ग हाेताे.
डेंग्यूचे रुग्णही वाढले
टायफाॅईडचे रुग्ण जेथे आढळले आहेत तेथील पाण्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नळातून गोळा केलेले पाण्याचे नमुने स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आढळले असून टँकरमधून येणा-या पाण्याचेही नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तसेच डेंग्यू बाबतही उपाययाेजना करण्यात येत आहेत. -डॉ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा