पुणे : संविधानाच्या नावाने आता जी ओरड होत आहे त्यातील अधिकारांचा आपण अभ्यास करत नाही. केवळ त्या अधिकारांवर गदा आली असे म्हणतो. मात्र त्या अधिकारांबरोबर येणा-या जबाबदारीचे भान आपण ठेवत नाही. येणा-या काळात विविध नवनवीन विकासाची दालने आपल्या सर्वांकरिता खुली होतील. त्याचा वेळीच लाभ घेण्याची गरज असून उज्ज्वल भवितव्याकरिता योग्य ‘‘नेतृत्व’’ निवडीची गरज आहे. असे मत माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केले.
सिंबायाेसिस इंटरनँशनल युनिर्व्हसिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सिंबायाेसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब.मुजूमदार, उपकुलपती डॉ.विद्या येरवडेकर, डॉ.रजनी गुप्ते आणि डॉ.आर.राजन उपस्थित होते.
देशउभारणीत तरुणांची भूमिका यावर बोलताना राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आगामी काळातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धडे दिले. ते म्हणाले, देशासमोर सध्या नवनवीन आव्हाने आहेत. मात्र त्यांना सामोरे जाण्याकरिता तरुणाई समर्थ आहे. चौकटीबाहेर जावून विचार करण्याची क्षमता आणि आपल्या पध्दतीने वेगळ्या सिध्दांताची मांडणी करत त्यांची वाटचाल सुरु आहे. काही वेगळे करु पाहणारा असा हा तरुणवर्ग आहे. देशातील 25 टक्क्यांहून अधिक तरुणाई सोशल मीडियावर कार्यरत आहे. आपल्या विकासाकरिता नेतृत्वाची निवड महत्वाची ठरते. या नेतृत्वाची निवड योग्य पध्दतीने व्हायला हवी. जगभरातील मोठी बाजारपेठ म्हणून पाहिल्या जाणा-या भारत देशात यापुढील काळात प्रचंड रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून त्याकरिता आपली कवाडे उघडण्याची गरज आहे. देश केंद्रीभूत मानून विकासाचा विचार व्हायला हवा. संविधानात नमूद केलेले अधिकार आणि स्वातंत्र्य यांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. ते तत्व पाळले गेल्यास मूल्यवान नागरिक तयार होतील. यावेळी राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. याप्रसंगी डॉ.शां.ब.मुजूमदार यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
अभ्यासात जेमतेम आणि बँकबेंचर्स होतो... अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेला माणूस मंत्रीपदापर्यंत पोहचु शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे सातत्याने लढण्याची असलेली इच्छा. पुण्यातील एनडीएमध्येच शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात फार हुशार नव्हतो. बँकबेंचर्स होतो. वर्गात गणिताच्या शिक्षकांचा तास सुरु असताना मागील बाकावर बसून हॉलीबॉलच्या सामन्याची रणनीती ठरवण्याचे काम सुरु असायचे. मात्र आतापर्यंतच्या प्रवासात ‘‘सेल्फ रिस्पेक्ट’’ हा कायम जपला. त्यामुळेच आलेल्या संकटांना समर्थपणे तोंड देण्याचे धैर्य आपल्यात आल्याची आठवण राठोड यांनी यावेळी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.