पुणे - पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले होते. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात आला असून ऐनवेळी हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानाला आता धर्मवीर आनंद दिघे यांच नाव देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच, याबाबतची सर्व प्रशासकीय मान्यता आणि परगवानग्यांची प्रक्रियाही पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं होतं. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला. त्यामुळेच, आपण हे नाव देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत माहिती मिळताच एकनाथ शिंदेंनी या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्याचं सूचवलं. त्यानुसार, या उद्यानाला आनंद दिघेंचं नाव देण्यात येईल, यासंदर्भात माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असेही सामंत यांनी सांगितलं.
घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती. असं असलं तरी या नामकरनाला प्रशासकीय मान्यता नाही. परिणामी आजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, उदय सामंत यांनी या उद्यानाचे धर्मवीर आनंद दिघे या नावाने उद्घाटन होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, संध्याकाळपर्यंत प्रशासकीय पातळीवर नामांतराच्या तरतुदी पूर्ण करण्यात येईल. हे उद्यान सामान्य नागरिकांसाठी आहे.इथे काय नाना भानगिरे सकाळ संध्याकाळ बसणार नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्यानाच्या उद्घाटनावरुन विरोध करणाऱ्यांना लगावला. दरम्यान, याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा
मुख्यमंत्री शिंदे हे सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्तालयात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पाऊणला ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते तुकाई दर्शन टेकडी येथील फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट देतील. शिंदे दुपारी अडीचच्या सुमारास जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेतील. त्यानंतर ३ वाजता शिवसेनेच्या जाहीर सभेस संबोधित करतील. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी नुकताच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून शिंदे हे सर्मथकांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. तशीच सभा ते सासवड येथेही घेत आहेत. सासवड येथील पालखी तळ मैदानावर ही सभा होईल. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता ते हडपसर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करतील.