पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. वेळीच सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांनी हल्लेखोरांना कारपासून दूर केल्याने आणि काहींना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पुण्यातील कात्रज येथे सिग्नलवर सामंत यांची कार थांबली असताना रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. 'अशा भ्याड हल्ल्यांमुळे आम्ही कोणीही एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पळून जाणार नाही, घाबरणार नाही. त्यामुळे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका', असं खुलं आव्हान सामंत यांनी हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना दिले.
"माझी कार सिग्नलला थांबली होती, त्यावेळी माझ्या बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले. त्यांच्या हातात बेसबॉलची बॅट होती तर दुसऱ्याने हाताला दगड बांधला होता. त्यांनी मला शिव्या देण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आलेल्या काहींच्या हातात सळ्या होत्या. या लोकांनी कार वर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. असा भ्याड हल्ला करून आमचे लोक एकनाथ शिंदेंना सोडून पळून जातील असं वाटत असेल तर ते चुकीचं आहेत. उलट आजच्या हल्ल्याने आम्ही अधिकच जवळ आलो आहोत. असले भ्याड हल्ले केल्याने घाबरणारा उदय सामंत नाही. पण मी कोणावर टीका करत नाही म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये. या हल्ल्याने दाखवून दिलंय की राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या पातळीला चालले आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"झालेला प्रकार निंदनीय आहे. अशाप्रकारे हल्ले झाल्याने उदय सामंत थांबणार नाही. नाना भानगिरे यांच्याकडचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा निघून गेला आणि माझी कार सिग्नलवर थांबली. त्यावेळी माझ्या कारच्या बाजूला अचानक दोन गाड्या आल्या आणि त्यातून १२-१५ लोकं उतरली आणि त्यांनी माझ्या कार वर हल्ला केला. ते लोक शिवसैनिक नव्हते असं उत्तर शिवसेनेच्या विनायक राऊतांनी सांगितले. पण मी सांगतो की अशा हल्ल्यांनी उदय सामंत थांबणार नाही", असे त्यांनी ठणकावून सांगितले.