पुणे : राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाहीत. इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी,असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयांचे पुढील सत्र ऑफलाइन पद्धतीने सुरू व्हावे, याबाबत येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जात आहे. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुद्धा सीईटी घेतले जाणार का ? याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूबरोबर झालेल्या बैठकीत या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार नसल्याचा निर्णय झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ९०८ ने वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांना तुकडी वाढ किंवा विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ देण्याबाबत कुलगुरूंनी तात्काळ निर्णय घ्यावा, यासं चर्चा करण्यात आले आहे. संदर्भातील प्रस्ताव येत्या ३१ ऑगस्ट पूर्वी राज्य शासनाला सादर करावेत, असेही सामंत त्यांनी नमूद केले.
सीईटीबाबत सामंत म्हणाले...
विद्यापीठाशी संलग्न कोणत्याही पारंपरिक महाविद्यालयांनी प्रवेशासाठी सीईटी घेऊ नये,याबाबतच्या सूचना उच्च शिक्षण विभागातर्फे शासनाला दिल्या जातील.तसेच स्वायत्त महाविद्यालयांच्या सीईटीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही,याची काळजी घ्यावी,याबाबत निर्देश दिले जातील,असे त्यांनी नमूद केले.
तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा
- एमबीए,एमसीए,आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट सीईटी २६ ऑगस्टपासून
- इंजिनिअरिंग सीईटी दोन सत्रात : पहिले सत्र - ४ ते १० सप्टेंबर दुसते सत्र -१४ ते २० सप्टेबर
- बी.ए.बी.एड,बी.एस्सी.,बी.एड,/ बी.एड.,एम.एड,बी.पी.एड.,एम.एड सीईटी २६ ऑगस्टपासून
- एलएलएम ५ वर्षे/ एलएलबी ३ वर्षे सीईटी 16 सप्टेंबरपासून