खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:37 PM2021-06-15T17:37:04+5:302021-06-15T17:37:44+5:30
लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते.
पुणे: लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजितदादांनी उदयनराजेंच्या भूमिकेला एकाच वाक्यात आणि आपल्या खास शैलीत टिप्पणी केली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर अजित पवारांना पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केले आहे यासंबंधी विचारले. पवार यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं म्हटलं आहे ना? असा प्रश्न उपस्थित केला. आणि दुसरीकडे असं बोलणारेही लोकप्रतिनिधीचं आहेत ना अशा शब्दात उदयनराजेंना चिमटा काढला. आता यावर उदयनराजे नेमकं काय बोलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सरकार न आल्यामुळे अजूनही विरोधकांच्या पोटात दुखतंय: अजित पवार
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. विरोधकांचं सरकार न आल्यामुळे अजूनही त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांना मराठा, ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं वाटतंय अशा शब्दात विरोधकांवर निशाणा साधला.
एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी...
अयोध्येत राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर पवार म्हणाले, जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी.