पुणे : आज साडेतीनशे वर्षे होऊन लोकांमधील शिवाजी महाराजांबद्दलचा आदर कमी झाला नाही. महाराजांपुढे पक्ष दुय्यम आहे. पण सध्या काही तुटपुंजे, फुटकळ विकृत लोकं अनावश्यक विधाने करतात. यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. नुपूर शर्माच्या बाबतीत घेतलेल्या डिसीप्लिनरी ऍक्शनसारखीच कारवाई राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता झाली.
पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ शिवप्रेमी एकत्र आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, यांनी पुणे बंदला पाठिंबा जाहीर दिला आहे. भाजपचे मंत्री, पदाधिकारी हेही छत्रपती शिवाजी महाराज, थोर, वंदनीय नेते यांच्याबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे भाजपनेही महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मोर्चात करण्यात आली.