पुणे : उध्दवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य शिंदेसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले आहेत.या विरोधात पुण्यातील नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत आंदोलन केलं आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमामध्ये शिंदेसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत पार पडली. त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
मॉडेल कॉलनी येथील नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये उध्दवसेनेच्या रेखा कोंडे, करूणा घाडगे, निकिता मारटकर, पदमा सोरटे, राेहिणी पल्लाळ, गायत्री गरूड, विजया मोहिते, सोनाली गुणवणे, गिरीश गायकवाड, युवराज पारीख आदी सहभागी झाले होते.यावेळी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी हातात टायर आणि मर्सिडीज गाड्याचे पोस्टर आणले होते. त्यावरती ‘शिवसैनिकांकडून स्वतःच्या गाडीचे टायर बदलून घेणार्या टायरवाल्या काकू, तुमच्या काळ्या टायरचा जाहीर निषेध’ अशा आशयाचा मजकूर असलेला फ्लेक्स घेऊन महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी सोबत आणलेल्या खेळण्यातील मर्सिडीज गाड्या दाखवत नीलम गोऱ्हे तुम्ही आता यातून फिरा म्हणत हल्लाबोल केला आहे.नीलम गोऱ्हे यांनी माफी मागावी अन् पावत्या द्याव्यानीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी आणि त्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या पदासाठीच्या पावत्या पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात असं उध्दवसेनेच्या महिला शिवसैनिकांनी म्हटलं आहे.