बारामती : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिले पाहिजे होते. मशाल आता रुजवायला वेळ लागेल, पण खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात येईल. कारण राष्ट्रवादीचा हा जन्मच खंजिरातून झालेला आहे. आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन की राष्ट्रवादी चे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला याला खंजीर चिन्ह द्या. फक्त ते एकमेकांत घुसवू नका, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पडळकर यांनी ही टीका केली.
यावेळी पडळकर पुढे म्हणाले, एक राजा होता, त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं. अस मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते, हे आता मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होते. आता शिवसेनेत झाली आहे, अशी टीका देखील पडळकर यांनी केली.
राज्यामध्ये कर्मचारी आणि असंघटित कर्मचारी यांची संख्या करोडोच्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन काही लोकांनी अनेक संघटना केल्या. कर्मचाऱ्यांना न्याय न देता कर्मचाऱ्यांचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतला. त्या कर्मचाऱ्यांचे शोषण केल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करीत होत्या. पंरतु त्यांना न्याय मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी ही संघटना उभी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. राज्य सरकारच्या कर्मचाºयाला मिळतो ते एसटी कर्मचाऱ्याला’ हा महत्त्वाचा मुद्दा कर्मचाऱ्यांचा आहे. तो मुद्दा आम्ही सरकारकडे लावून धरणार असल्याचे पडळकर म्हणाले. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते आदी उपस्थित होते.
...ते दोघे एकत्रित निर्णय घेतील
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे बारामती लोकसभा निवडणुक लढविणार असल्याची घोषणा ‘रासप’ पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत पडळकर म्हणाले, ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.‘रासप’ हा ‘भाजप’ बरोबर आहे. घटक पक्षाबाबत निर्णय सांगु शकेल,एवढा मोठा मी नेता नाही. महादेव जानकर साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे एकत्रित बसून त्याचा निर्णय घेतील,असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.