लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: स्व. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी नेहमीच वंदनीय आहेत; परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे; परंतु उद्धव यांना भाजपबरोबर यायचे असेल तर त्यासाठी दारे कायम खुली राहतील, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केले.
मौर्य पुणे दौऱ्यावर आले असताना एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद नसून ते कायम उघडेच आहेत; पण याकरिता उद्धव ठाकरेंनाच चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजप चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण, त्यांनी चूक केली आहे. भाजपने चूक केली नाही,' असेही मौर्य म्हणाले.
आमची कोणत्याही पक्षाशी दुश्मनी नाही. राज ठाकरे यांना आमच्याबरोबर यायचे असेल, तर तेदेखील येऊ शकतात. असे सांगून मौर्य यांनी जे ५० खासदार निवडून आणू शकत नाहीत, असा विरोधी पक्ष मोदींना रोखण्यासाठी विरोधी - पक्षाच्या बैठका घेत असल्याची 1 टीकाही त्यांनी यावेळी केली.