राजगुरुनगर : शरद पवार साहेबांचा वरदहस्त डोक्यावर म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदाराला काही काम नसल्यामुळे वाद,भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम करित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा डोक्यावर हात आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, असा स्पष्ट इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला आहे. यामुळे अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे आधीच धुसफूस सुरु असलेल्या महाविकास आघाडीत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण खासदार डॉ कोल्हे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रस्ता होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री, माजी खासदार यांचे फोटो व नसल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्त्य संतप्त झाले होते. माजी खासदार आढळराव शिवसेनेचे कार्यकर्त्यासह येऊन शुक्रवारी खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावरून खासदार डॉ. कोल्हे आज रस्ता उद्घाटनप्रसंगी टीका केली.
कोल्हे म्हणाले, खेड बाह्यवळण रस्त्याचे श्रेय द्यायचे असेल तर ते नितीन गडकरींनाच द्यायला हवे. मात्र, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे आता वय झाल्याने असा अनाधिकृतपणे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा करत आहे .बैलगाडा, विमानतळ,रेल्वे यावरून टीका करून माजी खासदार श्रेयवादासाठी धडपडत आहे . जुलै २० मध्ये या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पूर्ण झाले. आढळराव १५ वर्ष खासदार असूनही त्यांना चाकणची वाहतूक कोंडी सोडवता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामात फक्त राजकारण करत असल्याचे कोल्हे म्हणाले.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले, माझ्या काळात तयार झालेल्या इमारतींचे उदघाटन स्व .सुरेश गोरे व आढळरावांनी केेले. मी त्यांच्यासारखी नौटंकी केली नाही. घाटाचे उद्घाटन करून त्यांनी काय साधले हे कळत नाही. निष्क्रीय आढळरावांच्या या नौटंकीचा आम्ही जाहीर निषेध करतो. रस्त्यातील अडथळे जेसीबीने काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचे पोलीस संरक्षण काढावे. आंबेगावात सहकार्य तर खेडला विरोध हे दुटप्पी धोरण योग्य नाही फक्त खेड तालुक्यातील विकास कामांना विरोध करतात. मतभेद निर्माण करुन भांडणे लावतात.त्यांच्या कालच्या उद्घाटन कृतीचा निषेध करतो.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,जुन्नरचे संजय काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, अनिल बाबा राक्षे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,माजी सभापती रामदास ठाकुर,दिलीप मेदगे,तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे,तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे, संध्याताई जाधव, नवनाथ होले, किरण पवार ,प्रविण कोरडे, उमेश गाडे,विलास मांजरे, उपस्थित होते
आजी माजी खासदारांमधला वाद काही थांबेच ना
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून सुरु झालेला वाद काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं.