ते शब्द मागे घेतो, उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:03 PM2022-01-15T20:03:22+5:302022-01-15T20:08:46+5:30
आज सकाळी पुण्यात अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का असा प्रश्न विचारला होता...
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज पुण्यात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांचे नाव घेतले होते. त्यांच्या या विधानाने चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यांनी हा उल्लेख जाणूनबुजून केला की अनावधानाने झाला याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनीच यावर खुलासा केला. आपले शब्द मागे घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असल्याचं स्पष्टीकरण दिले. पुण्यातील विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, " मी तसा उल्लेख केला असेल तर त्यातील आदित्य हा शब्द मागे घेतो आणि उद्धव ठाकरेच (uddhav thackeray) मुख्यमंत्री आहेत हा शब्द देतो. सभागृहात चुकल्यानंतर जसं शब्द मागे घेतो म्हणतो तसच मी हे शब्द मागे घेतो. राज्याचे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत." असे सांगत त्यांनी आपली चूक झाल्याचे कबूल केले.
आज सकाळी पुण्यात अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते 'जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील. अजित पवारांच्या या विधानाने उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून ते सार्वजनिक जीवनात फारसे सक्रिय दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी बोलत असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी आपला भार हलका केल्याचे बोलून दाखवले होते. मुख्यमंत्र्यांनीच आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने काही काळ सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.