सासवड (पुणे) : आयुष्यभर काँग्रेस विरोधात लढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेइमानी व गद्दारी करणारे उद्धव ठाकरे हे महत्त्वाकांक्षेपोटी २००९ मध्येच मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत होते. पण २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसशी लाचारी पत्करून मुख्यमंत्रिपदी अडीच वर्षे बसून केवळ दोन वेळा मंत्रालयात जाण्याचा विक्रमही केला. त्यामुळे त्याला चूलकोंबडा मुख्यमंत्री म्हणावे लागेल, अशी टीका शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी केली.
पुरंदर-हवेली शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकारी व जुने कार्यकर्ते यांचा नियुक्ती पत्र वाटप मेळावा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री राज्याचे सेना विभागीय प्रवक्ते विजय शिवतारे, राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, पुणे जिल्हा महिला संघटक ममता लांडे-शिवतारे, जिल्हा सेनाप्रमुख दिलीप यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, सचिव प्रवीण लोळे, रमेश इंगळे, भानुदास मोडक, नितीन कुंजीर, कपिल भाडळे, आदींसह दोन्ही तालुक्यांचे पदाधिकारी महिला व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी आता शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकली असून, संजय राऊत कधी शिवसेनेत आले आहेत हे मला आठवत नाही, असाही टोला लगावत कदम म्हणाले, वाघासारखी माणसे बाळासाहेबांना आवडत होती. त्यांना घरी बसविण्याचे पाप हे बापलेक करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री व निमंत्रक विजय शिवतारे, दिलीप यादव, राज्य महिला प्रवक्त्या ज्योती वाघमारे, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, डॉ. ममता लांडे व हवेली युवा समन्वयक यांची मनोगते व्यक्त झाली. माजी सभापती व जिल्हा प्रवक्ते अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.
आम्ही कधी बाहेर जातोय याचीच वाट पाहिली
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना अनेक बैठकांची उदाहरणे दिली. मंत्री, आमदार, खासदार कार्यकर्ते यांना भेट टाळणारा मुख्यमंत्री मी पहिला नाही. पक्षांतर्गत नाराजीमुळे पक्ष फुटला हे बाळासाहेबांना कळले असते तर ते ५० आमदारांना आणायला गुवाहाटीला गेले असते. पण, बोलकी माणसे ठेवून, आम्ही कधी बाहेर जातोय यांची वाट पाहण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. आता महिला संघटन आणि त्यांच्या प्रतिष्ठेबाबत काम करावे लागेल. बचत गटांच्या महिला संघटित करून प्रत्येक महिन्यास वेळ देऊन त्यांचे प्रश्न, अडचणी याबाबत मीटिंग घ्यावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे केले.