पुणे : ‘‘बहोत टुटा बहोत बिखरा, बखेडे सून नही पाया, हवाओ के इशारो पर मगर मै बह नहीं पाया, अधुरा अनसुनाही रह गया यू, राज का किस्सा, कभी तूम सून नही पाये, कभी मै कह नहीं पाया...’’ अशी कविता सादर करून कवी कुमार विश्वास यांनी उध्दव ठाकरे यांची व्यथा उलगडली. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
पुणे पुस्तक महोत्सवात सोमवारी दुपारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर कुमार विश्वास यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितल्यानंतर शेवटी कुमार विश्वास यांनी राजकारणावर कविता सादर केली. त्यामुळे फर्ग्युसनच्या मैदानावर पॉलिटिकल क्लासच भरल्याचा ‘फिल’ आला.
मला बोलावण्याची रिस्क आयोजकांनी घेतली आहे, त्यामुळे आता त्यांचे काय होणार ? याचा त्यांनी विचार करू नये. विनोदभाई यांनी मला बोलावले खरे, पण आता माझ्याकडे माईक आहे आणि ते समोर बसले आहेत. त्यांच्यासाठी देखील मी चार ओळी गाणार आहे. विनोदभाईंना उध्दवजी एकनाथ शिंदे यांच्याविषयी समजावून सांगत आहेत, असे समजून या ओळी ऐका.
‘‘समंदर तीर का अंदर है, लेकीन रो नही सकता,
ये आंसू प्यार का मोती, इसको खो नही सकता,मेरी चाहत को अपना तू बना लेना,
जो मेरा नही हो पाया, वो तेरा हो नही सकता!’’या ओळी सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या राजकीय फटकेबाजीला दाद दिली.
...तर विनोद तावडे मुख्यमंत्री !
विनोद तावडे यांनी नुकतेच नागपुरात ‘मी मुख्यमंत्री व्हावे, असे तुम्हाला वाटत नाही का?’ असा सवाल पत्रकारांशी वार्तालाप करताना उपस्थित केला होता. त्यावर राज्यभर चर्चाही रंगली. आज कुमार विश्वास हाच धागा पकडून म्हणाले, माझ्या मैफलीला यापूर्वी अनेक राजकीय व्यक्ती उपस्थित होते. आज विनोद तावडेजी उपस्थित आहेत. ते आज पंतप्रधान झाले. पण विनोद तावडेजी पंतप्रधान नाही तर किमान मुख्यमंत्री तरी नक्कीच होतील.’’ या वक्तव्यावर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.