बारामती : निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये जावे. त्या ठिकाणी न्याय मागावा. आम्हाला आशा आहे की न्यायदेवता निश्चित या प्रकरणात योग्य तो न्याय करेल, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती येथे रविवारी( दि. १९) विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठक देखील घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक निवडणुका लढवल्या. अनेकांना त्यांनी आमदार, खासदार केले मंत्री केले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही एकोप्यानेच काम करतो. जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो.
दोन हजार कोटी रुपये घेऊन निवडणूक आयोगाने चिन्ह व पक्षाचे नाव शिंदे गटाला दिले असा आरोप नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता, याबाबत माध्यमांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत अज्ञानी आहे. मला हे माहिती नाही. मात्र एक जबाबदार खासदार अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर सभागृहामध्ये आम्ही आमदार व खासदार काही भूमिका मांडली तर ते खरं समजून पुढे जायचे असते असा सभागृहाचा नियम आहे. कोणीही काहीही आरोप केले तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या आरोपाला देखील आम्ही फारसे महत्त्व देत नाही. पवार साहेब कृषी मंत्री असताना हीच खासदार मंडळी आपली वेगवेगळी कामे घेऊन साहेबांकडे जात होती. अनेक कामे मार्गदेखील लावत होते. महाराष्ट्रातील खासदारांना दिल्लीमध्ये साहेबांचा आधार वाटत होता. त्या काळातील यांची वक्तव्य काढून जर पाहिली तर तुम्हाला कळेल ते काय म्हणत होते. सध्या राजकीय चित्र बदलले असल्यामुळे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, अशा शब्दात खासदार प्रताप जाधव यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उत्तर दिले.
सरकार शिवस्मारकाच्या कामाकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाही
सगळ्या परवानग्या न घेता अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विषय निर्माण झाले. त्या सर्व अडचणींचे निरसन अद्यापही झाले नाही. हे सरकार शिवस्मारकाच्या कामाकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे तेवढे दिले जात नाही. शिवस्मारक त्याच ठिकाणी व्हावे की इतर ठिकाणी याबद्दल मी वाद होऊ शकतात अनेकजण याबाबत वेगवेगळी मत मतांतरे व्यक्त करत आहेत. मात्र मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वोच्च स्मारक तयार झाले. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक कीर्तीचे स्मारक लवकरात लवकर तयार व्हावे अशी शिवप्रेमींची भावना आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.