Uddhav Thackeray On Vasant More: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीने शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी बंद पडलेल्या बसमधील वास्तव समोर आणलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करुन या प्रकरणाची दखल घेतली.
स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सर्वच राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात जाऊन आंदोलन केलं. वसंत मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकातील भयाण वास्तव समोर आणले. वसंत मोरेंच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करुन त्यांचे कौतुक केले आहे.
वसंत मोरे यांनी एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या संवादाचा ऑडिओ शेअर केला. "कोण म्हणते मातोश्रीवर कामाची दखल घेतली जात नाही. आंदोलनानंतर अगदी काही तासातच पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतसाहेब दोघांचीही पाठीवर थाप. आंदोलनात सहभागी सर्व शिवसैनिकांचे महिला रणरागिणींचे अभिनंदन केले आणि जिथे अन्याय दिसेल आणि विशेष महिला भगिनीवर अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असा आशीर्वाद, धन्यवाद साहेब..." अशी पोस्ट वसंत मोरेंनी केली.
"जय महाराष्ट्र वसंत, चांगलं केलंत, जोरात केलंत, बोलण्याच्या पलीकडे परिस्थिती आहे. जे आपण लढतोय, कारण आपला जीव जळतोय, महाराष्ट्र कुठे चाललाय, या लोकांना पोलिसांची भीती नाही. चांगलं केलंत तुम्ही, सगळ्यांना धन्यवाद द्या" असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर वसंत मोरे यांनी, "साहेब खूप घाणेरडा प्रकार होता, एसटीमध्ये लॉजिंग केलं होतं, जाणारी लोकं सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोरूनच जातात," असं म्हटलं.
दरम्यान, स्वारगेट बसस्थानकातील आंदोलनानंतर बंद पडलेल्या बसेसची परिस्थिती दाखवली. एसटीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम पडलेले आहेत. याचा अर्थ काय, इथे जो प्रकार घडला आहे, तो इथे रोज होतोय. यामध्ये या कर्मचाऱ्यांचा हात आहे. हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी केला.