पुणे : ‘उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, त्यांच्याबद्दल मला काहीही विचारू नका. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीही नव्हते, फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते. आता त्यांच्याकडे फक्त मातोश्रीच राहील’, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या मी दीडशे बैठका घेतल्या या दाव्याबाबत मला काहीच माहिती नाही’, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पुण्यात आलेल्या राणे यांनी नंतर पत्रकारांबरोबर संवाद साधला. ठाकरे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्टर लावण्याबाबत विचारले असता त्यांनी, ‘ठाकरेंचे मला काहीही विचारू नका’, असे उत्तर दिले. ‘ते म्हणजे महाराष्ट्र नाही, दुसरे विषय बरेच आहेत’, असे ते म्हणाले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेल्यापासून ते आताचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार बनेपर्यंत आपण स्वत: दीडशे गुप्त बैठका घेतल्या, या आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत राणे म्हणाले, ‘ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. ते महाराष्ट्रात मुंबईत असतात व मी दिल्लीत असतो. अशा विषयांवर ते माझ्याबरोबर कधी बोलत नाही. त्यामुळे याबाबत काहीच सांगता येणार नाही’, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे अशा दोन यात्रा निघणार आहेत. राज्यातील एकूण वातावरण लक्षात घेता तुम्ही याबाबत दोघांनाही काय सल्ला द्याल? यावर राणे यांनी ‘ऐकणाऱ्यांना सांगेन, न ऐकणाऱ्यांना सांगू शकत नाही. त्यांना यात्रा काढायचीच आहे. सावरकरांबद्दल न असलेले प्रेम त्यांना दाखवायचेच आहे. ऐकणारे आमच्या पक्षाचे आहेत. त्यांना सांगेन.’