बारामती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद उमटले. संतप्त झालेल्या येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहरातील भिगवण चौकात केंद्रीय मंत्री राणे यांच्याविरोधात निदर्शने करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. तसेच मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीसांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना संपर्क जिल्हाप्रमुख अॅड राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हातात कोंबड्या घेत आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी उध्दवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आवाज कोणाचा, आवाज शिवसेनेचा, शिवसेना झिंदाबाद, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है तसेच नारायण राणे मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना अॅड काळे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व सुरक्षीततेचा प्रश्न जाणुन बुजुन निर्माण करीत आहेत. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनजीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे जीवन धोक्यात आले आहे. नुकतेच नाशिक येथील कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रती एकेरी भाषा वापरून मुख्यमंत्री व संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यामुळे त्याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकेरी आणि शिवराळ भाषा वापरत त्यांची कुवत दाखवली आहे.त्यांचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.