पुणे : उदमांजर हे शहरात अनेक ठिकाणी आढळून येते. त्यामुळे त्याला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ते मासे, पाली, बेडूक असे छोटे प्राणी खाऊन जगते. तसेच काही फळंही त्याचे खाद्य आहे. त्यांना त्रास दिला नाही, तर ते चावत नाहीत. ते आपल्या मार्गाने निघून जातात. ज्या ठिकाणी उदमांजर सापडले असेल, त्याच परिसरात त्यांना सोडणे गरजेचे असते. कारण त्याचे कुटुंब तिथे कुठेही असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भवानी माता मंदिर परिसरात एका फॅब्रिकेशनच्या दुकानात उदमांजर सापडले आहे. तेथील दुकानमालक अमित सकुंडे आणि रोहित ओझरकर यांनी या उदमांजराची माहिती वनविभागला कळविली. त्यानंतर वनरक्षक के. के. कड यांनी त्वरित त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल केले आहे. त्याची तपासणी करून नंतर निसर्गात सोडण्यात येणार आहे.
उदमांजर याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी शहरात अनेक ठिकाणी दिसून येतो. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर हा मोठ्या प्रमाणावर राहतो.
——————————
उदमांजर हा मध्यवर्ती शहरात कॉमन आहे. अनेक ठिकाणी आढळून येतो. त्यामुळे नागरिकांनी त्याला घाबरू नये. आपण त्याला त्रास दिला नाही, तर काही करत नाही. ज्या ठिकाणाहून त्याला पकडले असेल, त्याच परिसरात त्याला सोडले पाहिजे. कारण त्याची फॅमिली तिथे आसपास असते. शक्यतो रात्रीच्या वेळी त्याला त्या परिसरात सोडले पाहिजे.
- डॉ. सतीश पांडे, प्राणितज्ज्ञ
————————————-
आमच्याकडे वन विभागाकडून उदमांजर आले आहे. त्याची तपासणी करून पुन्हा निसर्गात सोडण्यात येणार आहे. तो नर जातीचा आहे. तपासणी झाल्यावर त्याला वन विभागला सुपूर्द करण्यात येईल, त्यानंतर त्याला निसर्गात सोडून देणार आहेत.
- सुचित्रा सूर्यवंशी-पाटील, वैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
—————————————-