पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने युजीसी-नेट परीक्षेचा (डिसेंबर २०२३) निकाल जाहीर केला आहे. एकूण ८३ विषयांमध्ये ५३ हजार ७६२ उमेदवार सहायक प्राध्यापकपदासाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये ५ हजार ३२ जणांना सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र हाेण्यासह ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय आणि विद्यापीठांसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकपदी नाेकरी मिळविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे युजीसी-नेट परीक्षा या पात्रता परीक्षेचे आयाेजन केले जाते. नेट डिसेंबर २०२३ परीक्षेचे दि. ६ ते १४ डिसेंबर आणि १९ डिसेंबर २०२३ राेजी देशातील २९२ शहरात आयाेजन करण्यात आले हाेते. परीक्षेसाठी ९ लाख ४५ हजार ८७२ उमेदवारांनी अर्ज केले हाेते. प्रत्यक्षात त्यातील ६ लाख ९५ हजार ९२८ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती.
उमेदवारांना एनटीएच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख लॉग इन करून निकाल पाहून स्कोअर कार्ड डाउनलोड करता येईल. युजीसी नेट डिसेंबर २०२३ परीक्षेचा निकाल सुरुवातीला दि. १० जानेवारी २०२४ राेजी जाहीर केला जाणार हाेता, मात्र त्यानंतर १७ जानेवारीपर्यंत निकालाची तारीख लांबविण्यात आली हाेती.