कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महाविद्यालये व विद्यापीठे मार्च २०२० पासून बंद ठेवली होती. मात्र, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करावे, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार विविध शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालय व विद्यापीठे सुरू करण्यासंदर्भात यूजीसीने नियमावली प्रसिद्ध केली आहे.
राज्य शासनाने व शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून विद्यापीठ व महाविद्यालय सुरू करावीत, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाच्या फैलावासंदर्भात शैक्षणिक संस्थांनी जागृती करावी. महाविद्यालयातील वर्गामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शिकवण्याची प्रक्रिया सुरू करावी. महाविद्यालयात अनोळखी व्यक्तींना येण्यास मज्जाव करावा. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय शैक्षणिक संकुलात प्रवेश देऊ नये.
मास्क बंधनकारक करावा
महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये मास्क बंधनकारक करावा, तसेच फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यासह वसतिगृह प्रयोगशाळा उपहारगृह याबाबत कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात सविस्तर सूचना यूजीसीने दिल्या आहेत.