राजेगाव : उजनी धरणातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने पाणलोट क्षेत्रातील शेतकरी धास्तावला आहे. वाटलूज, मलठण परिसरातील म्हसोबा मंदिर परिसरात असणाऱ्या कृषिपंपाला यंदा लवकरच घरघर लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नदीपात्रात जे दृश्य दिसत होते, तेच दृश्य फेब्रुवारी महिन्यात दिसू लागल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. उजनी धरणातील बॅकवॉटरच्या पाण्यावरच अनेक गावांतील पाणी योजना अवलंबून असल्याने नदीपात्रातील पाणीपातळी खालावल्याने पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता आहे. या वर्षी धरणसाखळीत कमी झालेल्या पावसाचा मोठा फटका उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रातील शेतीला बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नदीपात्रातील पाणी जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे नदीपात्रात पाइप वाढविणे, केबल वाढविणे, फुटवॉलपर्यंत पाणी येण्यासाठी चारी तयार करणे इत्यादी आवश्यक कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नागदरी व शंख-शिंपले फुटवॉलमध्ये अडकत असल्याने पाइप स्वच्छ करण्यासाठी शेतकरीवर्गाला रात्री-अपरात्री नदीच्या पात्रात उतरावे लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (वार्ताहर)दौंड तालुक्यातील पूर्व भागातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, मुगाव, शिरापूर, देऊळगावराजे, वडगावदरेकर, पेडगाव इत्यादी गावे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येतात. ही गावे खडकवासला कॅनॉलच्या टेलला (अंतिम भागात) असल्याने खडकवासला कॅनॉलचे पाणी या भागात पुरेशा प्रमाणात कधीही पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रामुख्याने उजनी धरणातील पाण्यावरच शेती करीत आलेला आहे. या गावातील अर्थकारणच उजनी धरणातील पाण्यावरच अवलंबून आहे.
उजनीच्या पाणीपातळीत घट; कृषिपंप बंद पडण्याच्या मार्गावर
By admin | Published: February 23, 2016 3:09 AM